【"दारूच्या व्यसनाधीनतेने गृहस्थी जीवनाची हानी झाली, शेवटी मानवधर्मातच सुंदर जीवनाची दिशा मिळाली"】
माझे नाव 'नारायण कृष्णरावजी मंडलेकर' आहे. आज मी "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.
मार्गात येण्याअगोदर आमच्या कुटुंबात ५ सदस्य होते. त्यात माझे आई-बाबा, माझा मोठा भाऊ (नामदेव), माझा लहान भाऊ (कैलाश) आणि मी. आमच्या कुटुंबात माझ्या बाबाला आणि माझ्या मोठ्या भावाला दारूचे व्यसन होते. ते पूर्णपणे दारूच्या व्यसनात डुबलेले होते. त्यामुळे आमची घरगृहस्थी अत्यंत खालावलेली होती. त्या वेळी माझे बाबा चौकीदारीचे काम करायचे आणि जेवढे पैसे मिळायचे, तेवढे पूर्ण दारूच्या व्यसनात उडवायचे. माझ्या मोठ्या भावाचे लग्न २००२ मध्ये झाले. तो वेगळा निघाला. त्यानंतर माझ्यावर घरची पूर्ण जीम्मेदारी वाढली आणि सोबतच मला पण दारूचे व्यसन लागले. माझ्या बाबाला दारूच्या व्यसनामुळे पैसे अपुरे पडायचे. या दारूच्या व्यसणामुळे घरची परिस्थिती नाजूक होऊन गेलेली होती. माझ्या आईला खूप विचार यायचा. त्यानंतर आईने माझ्यासाठी मुलगी बघायचे ठरवले. त्यावेळी बाबांनी आमच्यासाठी काहीही कमवून ठेवलेले नव्हते. या परिस्थितीत लग्न करायला घरी पैसे नव्हते. मित्रांचा सहारा घेऊन जवळपास ३०,००० रुपये गोळा केले आणि मी २४ मे, २००६ ला माझे लग्न झाले. मी माझ्या प्रपंचाला सुरवात केली. लग्न झाल्यानंतर मी माझे दारूचे व्यसन बंद केले. आमचा संसार चांगला सुरू झाला.
त्यानंतर २२ मार्च, २००७ या वर्षी माझी मोठी मुलगी जन्माला आली. आम्ही सव्हा महिन्यानंतर बारसे केले. दुसरी मुलगी २३ सप्टेंबर, २००९ या वर्षी जन्माला आली. माझा प्रपंच वाढला. त्यावेळी माझ्या घरी कमवते वेक्ती मी एकटाच होतो. माझे बाबा स्वतःचे व्यसन पूर्ण करण्याकरिता फक्त कमवायचे. घरी मुळीच पैसे द्यायचे नाही. माझ्यावर माझ्या लहान भावाचा भार पडलेला होता. त्या वेळी तो शिकत होता. त्या परिस्थितीत मी मोटर लाईन मध्ये नोकरी करत होतो. तिथे पैसे भरपूर मिळायचे. कालांतराने माझ्या मोठ्या मुलीला मोठं पाठवली. त्यानंतर माझ्या त्याच मुलीला घालत दिली. पहिल्या दिवशी तिने उलटी केली, त्या वेळी असे वाटले की, खाण्यामध्ये काही कमी-जास्त झालं असणार. फार काही विचार केला नाही. दुसऱ्या दिवशी परत उलटी केली. त्यानंतर मी तिला हिंगणा या गावी वागउमरी या ठिकाणी घेऊन गेलो. तिथे एका बाईच्या अंगात देवी यायची. तिने माझ्या मुलीची घालत वगैरे काढून दिली. तिला घरी घेऊन आलो, त्यानंतर मी विचार केला की, इतके देवी-देवतांचे करून सुद्धा आराम नाही, कोणाचा साथ नाही. त्यानंतर मी खूप गोंदळून गेलो. या त्रासामुळे माझे हळू हळू दारूचे व्यसन सुरू झाले. त्या वेळी मला मोटर लाईनचा पैसा दिसायचा. माझे दारूचे व्यसन खूप वाढले. जे मी कमावले होते, ते सर्व गमावले होते. माझ्या व्यसणामुळे माझी सर्व इज्जत गेलेली होती. मला माझे नातेवाईक कोणीही ओळखायचे नाही.
कालांतराने माझ्या आईची प्रकृती खूप खराब झाली. डॉक्टरांनी सांगितले की, तुमची आई जास्त दिवस जगणार नाही. जेवढी सेवा होते, तेवढी सेवा करा. त्यानंतर माझ्या आईला घरी आणले आम्ही २ महिने सेवा केली. त्यानंतर माझी आई माझ्यातून निघून गेली. दिवसेंदिवस घरची परिस्थिती आर्थिक, मानसिक रित्या गंभीर होत होती. माझे दारूचे वेसन खूप वाढलेले होते. मी खूप परेशान झालो होतो. काही दिवस असेच दारूचे व्यसन खूप करत गेलो आणि या दारूच्या व्यसनात घरी खूप भांडण करत होतो. माझे घर पूर्ण उद्ध्वस्त होऊन गेलेले होते. मला नेहमी चिडचिड व्हायची. त्यावेळेस माझ्या लहान भावाने मला खूप समजावले. त्यावेळी मी खूप विचार केला. मी नेहमी माझ्या मावस सासच्याकडे नेरला या गावी जात होतो. तर त्यांच्याकडे 'परमात्मा एक' सेवा होती. नेरला या गावी बाबांचे भवन सुद्धा होते. त्या गावी गेल्यानंतर माझे मावस सासरे मला त्या भवनामध्ये नेहमी न्यायचे, ते माझ्या लक्षात आले आणि मी स्वतः आठ दिवस विचार केला. असा विचार केला की, आपला थारा कुठेही लागणार नाही, फक्त परमात्मा एक मार्गातच लागणार. कारण घरचा कमवणारा मी एकटाच होतो आणि मी निघून गेलो तर माझा संसार पूर्ण उद्ध्वस्त होणार. मी माझ्या पत्नीला म्हटले की, आपण मार्ग स्वीकारू. पण माझी पत्नी म्हणाली की, तुम्ही दारू सोडणार नाही, तर मी म्हटले की मी पक्का विचार केला आहे आपण मार्ग घेऊया.
आम्ही पतीपत्नीने पक्का विचार केला आणि सकाळी नऊ वाजता गावातील मार्गदर्शक रामभाऊजी सावरकर यांच्याकडे गेलो होतो. तर काकू बोलल्या की काकाजी झोपले आहेत, तुम्ही दहा वाजता या. ती वेळ माझी कामाची वेळ होता तर मी तिथून निघून घरी आलो. त्यानंतर मी कामाला गेलो आणि जिथे काम सुरू होते, ते घर सेवकाचे होते. त्यांचे नाव शालिकजी राऊत होते. राऊत काकजींच्या पत्नीला मी सांगितले की, मला मार्ग घ्यायचा आहे. त्या काकू बोलल्या की चांगली गोष्ट आहे. त्यानंतर त्यांनी म्हटले की, तुम्ही सायंकाळी या आणि काकाजी सोबत बोलून घ्या. त्यानंतर मी काकाजी सोबत बोलून त्यांनी मला मार्गाबद्दल रूपरेषा सांगितली आणि त्यांच्यासोबत गावातील सेवक मधुकरजी पोटभरे यांच्याकडे त्यांनी नेले. मधुकर काकाजीनी सुद्धा मार्गाबद्दल मार्गदर्शन केले आणि त्यांनी म्हटले की, तू उद्याला सकाळी पूर्ण परिवार घेऊन माझ्याकडे ये आपण मार्गदर्शक काकाजीकडे जाऊ. मी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सर्व तयार झाले पण माझा लहान भाऊ तयार नव्हता कारण, तो कुठल्याही देवाला मानत नव्हता. त्यावेळी त्याला सुद्धा दारूचे व्यसन लागलेले होते. माझा भाऊ बोलला की, मी तुझ्या घरी दारू पिऊन येणार नाही, पण मी मार्ग सुद्धा घेणार नाही. त्यानंतर मी माझ्या बाबांचे विचार घेतले आणि आम्ही पतिपत्नी, माझ्या दोन मुली आणि माझे बाबा आम्ही गावातील सेवक मधुकरजी पोटभरे यांच्याकडे गेलो. तिथे आम्हाला गावातील सेवक विठ्ठलजी कुंभलकर, भगवानजी सरोदे हे मिळाले आणि आम्ही या सेवकांबरोबर कान्हानचे मार्गदर्शक उमरावजी बांते काकाजीकडे गेलो.
त्यानंतर काकाजींनी आम्हाला मार्गात येण्याचे कारण विचारले तर मी सांगितले की, मला दारूचे खूप व्यसन आहे आणि माझ्या मुलींचे बरोबर वागवत नाही. काकाजींनी सांगितले की, ठीक आहे, तू तुझ्या घरची साफसफाई कर आणि अकरा दिवसाचे कार्य सुरु करून भगवंताची ज्योत तुझ्या घरी लाव आणि त्यावेळी मी फक्त काकाजीकडून १३ फेब्रुवारी, २०१२ या दिवशी शब्द घेऊन आलो होतो आणि परिस्थिती इतकी गंभीर होती की, अगरबत्ती घ्यायलासुद्धा पैसे नव्हते. त्यावेळेस माझ्या घरी देवी-देवतांच्या फोटो वगैरे भरपूर होते. ते विसर्जन करण्याकरता तीनदा सायकलने कन्हान नदीवर चक्कर मारली आणि तिसर्या वेळी जातांनी विचार केला की, आता मला अगरबत्ती, तेल घ्यायचे आहे. मी सर्व विसर्जन केल्यानंतर थैली उचलली तर मला थैली भारी लागायला लागली. थैली भारी का लागते? म्हणून मी थैलीमध्ये बघितले. थैलीमध्ये पितळ्याच्या मुर्त्या होत्या, कारण मी प्रत्येक नवरात्रामध्ये वगैरे कुठे यात्रेला वगैरे गेलो तर पितळेच्या मुर्त्या घेत होतो. त्यानंतर ती थैली घेऊन भांडे वाल्याच्या दुकानात गेलो आणि त्या दुकानवाल्या दादाला म्हटले की, बापू ह्या पितळेच्या मुर्त्या घे आणि तुला जे द्यायचे आहे ते तू देऊ शकते. दुकानवाला दादा बोलला की, किती पैसे देऊ? मी म्हटले की, तुला जे द्यायचे आहे ते तू दे. त्या दादानी मला १६० रुपये दिले. त्या पैशाने मी अगरबत्ती, कापूर, तेल घेतले आणि १४ फेब्रुवारी २०१२ या दिवशी पासून मी कार्याला सुरुवात केली. ज्या दिवशी भगवंताची पहिली झोप लागली त्या दिवशी असे वाटायचे की, घरी काहीही नसतांना भरभराट आहे. ११, २१ अशाप्रकारे कार्याला मी सुरुवात केली.
त्यानंतर जवळपास चार महिने झाले होते. माझे बाबांनी आमच्या सोबत चांगले कार्य केले. त्यानंतर त्यांची मनस्थिती बदलली आणि त्यांनी दारूचे व्यसन केले. त्यावेळी मला विचार आला की, माझ्या बाबांनी दारूचे व्यसन केले तर मी आता काय करावं? मी काही सेवकांना सांगितले. त्यावेळेस मी माझ्या बाबांना पाणीसुद्धा दिले नाही. त्यानंतर कार्यकर्ता काकाजींना सांगितले. काकाजींनी म्हटले की, दारूचे व्यसन केले असल्यावर त्यांना काहीही खायला-प्यायला द्यायचे नाही. कार्यकर्ता काकांजींच्या शब्दाचे मी पालन केले. मी माझ्या बाबाला आठ दिवस जेवण, पाणी काहीही दिले नाही. काही दिवसानंतर माझ्या बाबांनी म्हटले की, यानंतर मी दारूचे व्यसन करणार नाही. त्यावर मी माझ्या बाबांना भगवंताला माफी मागायला लावली. माझ्या बाबांनी भगवंताला माफी मागितली आणि माझ्या कार्याला पुन्हा सुरुवात केली.
असेच दिवस निघत गेले आणि जवळपास आम्हाला एक वर्ष झाला, त्यानंतर माझ्या प्रकृतीमध्ये फरक पडायला लागला. तसेच माझ्या मुलीच्या प्रकृतीमध्ये फरक पडायला लागला. तर असे का बरं होत आहे, म्हणून मी माझ्या भावाला विचारले की, तू दारुचे व्यसन करून घरी येतोय का? तू मला शब्द दिला होता, मी दारू पिऊन तुझ्या घरी येणार नाही. त्यावर माझा भाऊ बोलला की, मी दारू पिऊन येत नाही. त्या वेळी माझा भावाचा सांभाळ मीच करत होतो. मी विचार केला की, माझ्या भावाचे लग्न करून द्यावे, जेणेकरून आपला संसार सांभाळणार. त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. मी विचार केला की, आपल्याला शेवटी कर्जबाजारी होणे आहे, तर यावर्षी याचे लग्न करून द्यायचे. ज्यावेळी लग्नाला एक महिना बाकी होता, त्यावेळी भगवंताने माझी परीक्षा बघितली. माझे मेंटेनन्सचे काम होते. मी कामाला गेलो होतो, त्यावेळी माझ्या पायावर इंजन पडले होते. सर्वांना वाटत होते की, माझा पाय तुटला असणार. त्यावेळी मी भगवंताला हाक मारली, भगवंता मी कसे करणार? मला वाचवा....! मी माझ्या पायाला बघितले, तर मला थोडा मार लागलेला होता आणि गुटणा फाटलेला होता. तसेच मी दवाखान्यात गेलो आणि चार टाके लागले. औषधे वगैरे घेऊन घरी परत आलो आणि विचार केला की, आपल्याला भावाच्या लग्नासाठी पैसे गोळा करायचे आहे. त्याच अवस्थेत मी दुसऱ्या दिवशी कामावर गेलो. त्यावेळी माझे टेंडर सुद्धा संपलेले होते. भगवंताला विनंती केली की, भगवंता माझ्या भावाचं समोर लग्न आहे त्याकरिता मला पैशाची गरज आहे, मला काम मिळू द्या. भगवंताने मला काम दिले. त्यानंतर मला पहिले काम कांन्द्री या गावाचे सहा हजाराचे मिळाले आणि दुसरे काम कन्हान या गावचे सात हजाराचे मिळाले. दुपारी बारा वाजेपर्यंत कांन्द्री या गावचे काम करत होतो आणि सायंकाळी सात वाजेपर्यंत कन्हान या गावचे काम पूर्ण करत होतो. याच कामानी भावाच्या लग्नाकरिता पैसे गोळा केले आणि भगवंताला योग मागितला की, माझ्या घरी प्रत्येक लग्नामध्ये भांडणे होत असतात, आता माझ्या भावाचे लग्न आहे तर माझ्या भावाचे लग्न चांगल्या प्रकारे पार पडू द्या. २ जून, २०१३ या दिवशी माझ्या भावाचे लग्न पार पडले. भगवंताने कुठेही कमीपणा पडू दिली नाही. माझा भाऊ घरगृहस्थिला लागता. त्यानंतर त्याला म्हटले की, तू तुझा संसार सांभाळ. असे करता-करता तीन महिने लोटून गेले. मला काम मिळत नव्हते. असे का बरं होते? म्हणून माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला असेच
एक दिवस माझा भाऊ दारू पिऊन घरी आला. त्याच्या पत्नीने एकत्र राहत असल्यामुळे तिनी त्याला जेवण दिले. त्यानंतर माझ्या लक्षात आले, मी माझ्या भावाला समजावले की, तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर मार्गात यावं लागेल, नाहीतर वेगळे निघावे लागेल. त्यांने म्हटले की, मला वेगळे राहायचे आहे. त्यानंतर माझ्या वडिलांनी पण दारू पिऊन भांडण केले. माझा भाऊ आणि माझे बाबा वेगळे निघाले, तो दिवस सोमवार होता आणि मंगळवार पासून मला काम मिळाले. पहिला ठेका मला नऊ हजाराचा मिळाला. काही दिवसानंतर माझे बाबा मला बोलले की, मला तुझ्यामध्ये राहायचे आहे. तर मी म्हटले की, तुम्हाला माझ्यामध्ये राहायचे आहे तर दारू सोडावी लागेल. आम्ही दोघेही भाऊ जरी वेगळे राहात असलो तरी आमचा दरवाजा एकच होता. काही दिवसानंतर माझी सून ही गरोदर होती आणि तिने म्हटले की, मी काही दिवसाकरीता आईकडे जाणार आहे. त्यात आम्हाला कार्य करायचे होते. भगवंताला विनंती केली की, माझ्या भावाला तिकडेच नोकरी मिळू द्या आणि तसेच घडले. त्याला तिकडे नोकरी मिळाली, तेही फक्त दोन महिन्याकरीता. माझा भाऊ आणि त्याची पत्नी दोघेही त्याच्या सासरी गेली.
त्यानंतर १३ फेब्रुवारी, २०१४ या दिवशी त्यागाच्या कार्याकरिता शब्द घेऊन आलो. १४ फेब्रुवारी, २०१४ या दिवशी त्यागाच्या कार्याला सुरुवात केली. भगवंतांनी माझी पहिल्याच दिवशी परीक्षा घेतली. त्या दिवशी माझा लहान भाऊ घरी आला आणि माझ्या घरी डाळींबाचे झाड होते त्या झाडाचे डाळींब त्याने तोडले. मला विचात आला की, आता मी कसे करणार? पण त्याला भगवंताने सद्बुद्धी दिली. त्याने माझ्या मुलीला २ रुपये दिले. भगवंतांनी पुन्हा एकदा परीक्षा बघितली. माझी सून काही कागदपत्र घेण्याकरिता घरी आली आणि माझ्या भावाने आणखी डाळिंब तोडण्याचा विचार केला. त्यावेळी त्याच्या पत्नीने म्हटले की, डाळींब नको तोडा. माझा भाऊ तोडायला गेला आणि लगेच तो खुर्चीवरुन पडला. असे घडताच तो निघून गेला. असे करता-करता माझे ३२ दिवस पार पडले. ३३ व्या दिवशी पुन्हा भगवंताने आमची पती-पत्नी दोघांची परीक्षा घेतली. आमचा एक पाय दुखायचा, तर एक हात दुखायचा. जिथे त्रास व्हायचा तिथे ज्योतीमधले तेल, अंगारा लावत होतो. त्यानंतर माझी मोठी मुलगी काही दिवस शौचालयला गेली नाही. तिचे जेवन बरोबर होते. मला विचार आला की, जेवण बरोबर असताना सुद्धा ही शौचालयला वगैरे जात नाही आहे. त्यागाची हवन जवळ येत होते आणि भगवंत परीक्षा बघत होते आणि त्या परिस्थितीत माझ्याकडे पैसे सुद्धा नव्हते. मला विचार आला की, मी त्यागाचे हवन कसे घडणार? भगवंताला योग मागितला.
त्यानंतर एक दिवस असेच मी मुलीला आणायला शाळेत गेलो तर एक व्यक्ती मला भेटले आणि बोलले की, एक काम आहे करशील काय? ते काम गहूहिवरा या गावाचे होते. मी म्हटले ठीक आहे. ज्यांच्याकडे काम होते मी त्यांच्याकडे गेलो. घरमालकीन काकूने विचारले किती किती पैसे घेणार, त्यावर मी म्हटले की, हे काम अकरा हजाराचे आहे. त्यावर घरमालकीण काकू म्हणाली की, मी नऊ हजार देणार. त्यावर मी नाही म्हटले. मी शेवट दहा हजार घेईल म्हणून बोललो. त्यावर घरमालकीण काकू बोलली की, तुम्हाला नऊ हजार मध्ये करायचे असणार तर करा, नाहीतर नको करा. त्यावर मी विचार केला की, हे काम मला भगवंतांनी दिलेले आहे. जर मी याला नकार देणार, तर माझ्यासारखा मूर्ख कोणी नाही. त्यानंतर मी ते काम केले. असे करता-करता माझे ४१ दिवस पूर्ण झाले. ४२ व्या दिवशी मी प्रसादी केली. त्यावेळी माझ्याकडे फक्त तीन हजार रुपये होते. मी कार्यकर्ता काकाजींकडे गेलो. काकजींनी मला सांगितले की, आपली परिस्थिती बघून हवनकार्य कर. मी शब्द घेऊन मंडळामध्ये गेलो. तिथून बाबांच्या फोटोचे देऊन मी प्रतिमा घरी आणली आणि भवन निधी आश्रम निधी बाकी ठेवली. मी त्यांना म्हटले की, मी मासिक नऊ हवने पूर्ण होत पर्यंत जमा करेल आणि २७ मार्च, २०१४ दिवशी त्यागाचे हवनकार्य पार पडले. त्या दिवशी खुशी झाली, आनंद वाटला आणि असे वाटत होते की, दिवाळीचा सण आहे.
त्यानंतर आमचे मासिक हवन सुरू झाले. असे करता-करता माझे पाच मासिक हवन पूर्ण झाले आणि सहाव्या हवनाच्या दिवशी माझ्या बाबांनी आजूबाजूच्या लोकांचे एकूण दारू पिले आणि घरासमोर येऊन भगवंताविषयी उलट-सुलट बोलायला लागले आणि ते बघा भगवंतांनी त्यांना अशी शिक्षा दिली की, जे त्या खुर्चीवर बसून होते त्या खुर्चीवरून खाली पडले आणि ते एका पायाने अपंग झाले. त्यानंतर माझे बाबा लहान भावांमध्ये राहिले. एका पायाने अपंग झाल्यामुळे त्यांचे बाहेर जाणे बंदच झाले आणि दारू कायमची सुटली. अश्याप्रकारे भगवंतांनी आमची खूप परीक्षा बघितली, खूप अनुभव अनुभवायला मिळाले. आता माझे बाबा माझ्यात राहतात. आमचा परिवार सुखी, समाधानी आहेत.
लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
सेवक :- नारायण कृष्णरावजी मंडलेकर
पत्ता :- मु. वॉर्ड नंबर- ०३ (माळीपुरा) कांद्री, पो. कन्हान ता. पारशिवनी, जि. नागपूर
सेवक नंबर :- ३२९८३
मार्गदर्शक :- श्री. उमरावजी बांते, कन्हान
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर.
■ आपल्या या युवा सेवकांच्या ग्रुप ला जुळण्याकरिता किंवा तुमच्या कुटुंबातील दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव "माझा अनुभव" या अनुभव मालिकेत प्रकाशित करण्यासाठी आम्हाला खालील क्रमांकावर WhatsApp msg करावे ही नम्र विनंती. जीवन एस. पाटील: 7020000823
टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.
सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
परमात्मा एक मानवधर्म परिवार
【युवा सेवकांचा ग्रुप】
🌏आम्हाला खालील सोशल मीडियावर भेट अवश्य द्या.
मार्गातील दुर्मिळ अनुभव दररोज वाचण्याकरिता या लिंकवर 👇🏿क्लिक करा.
परमात्मा एक मानवधर्म परिवार [Facebook page]
बाबांचे मार्गदर्शन व मानवधर्म कविता ऐकण्यासाठी या लिंकवर👇🏿क्लिक करा
परमात्मा एक मानवधर्म परिवार [You tube Channel]
वरील अनुभव वाचन केल्यावर आपल्या या ब्लॉगला या खालीलप्रमाणे प्रकारे 'FOLLOW' करा. या पोस्ट च्या खाली जा.
मग,
Home म्हणून दिसेल
या खाली view web Version वर क्लीक करा, त्यानंतर आपलं स्वागत बॅनर दिसेल त्या बॅनर चा डाव्या बाजूला निळ्या फ्रेम मध्ये follow बटन आहे. त्यावर क्लिक करा, मग पुन्हा follow बटन लाल कलर मध्ये येईल व सोबत आपली ईमेल id पण दिसेल, मग तिथे लाल बटन असलेलं follow वर क्लिक करा, त्यानंतर स्वागत बॅनर पेज ओपन होईल तिथे तुम्हाला Unfollow दिसेल याचा अर्थ तुम्ही तुमचं काम परफेक्ट केलं आहे.
टीप: ही माहिती सर्व सेवकांना नक्की शेयर करा. त्यांना पण या भगवत कार्यात सहभागी होण्याची संधी द्या.
📱 FOLLOW करण्यास काही अडचण आल्यास 7020000823 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्सएप मॅसेज करा.